खिडकी
असच घर हव होता मला.. पाऊस
बघणारं. पूर्वी कसं, फ्लेट मध्ये राहिल्यामुळे केवढाहि मोठा पाऊस असला तरी फक्त
चौकोनी खिडकी एवढा दिसायचा. विजा, ढग, वेड्यासारखा वारा आणि त्याहून वेडा पाऊस. पण
तो दिसायचा फक्त ६ बाय ३ फुटाच्या चौकटीतून समोरच्या निर्जीव इमारती नंतर उरलेल्या
अवकाशात. पण आता नाही. हे छान आहे. दिवाणखान्याच्या फ्रेंच विंडो समोर मोकळी बाग
आहे, आणि त्या पुढे निळ्या डोंगरांच्या
रांगा. छान दिसेल पाऊस इथून. पण अवकाश आहे अजून. आधी हे मे महिन्याचं उन रणरणतय ते
सरुदेत. घामाच्या धारा लागतायत नुसत्या. बेचैन होतो जीव. काही सुधरतच नाही. पण समोरच्या
मोठ्या खिडकीतून गुलमोहर डोकावतो तेव्हा छान वाटतं. तेवढाच विसावा.
आज संध्याकाळ पासून मळभ
दाटून आलंय. अवेळीच पाऊस येतोय की काय? छे, शक्यता कमीच वाटतेय. फसवे ढग आहेत ते.
आणि असे ढग आले की वाराही येत नाही. सगळं स्तब्ध. मोठी खिडकी एखाद्या मोठ्या चित्राच्या फ्रेम सारखी दिसतेय.
काळे निळे ढग, काळे डोंगर, काळेच माड . तिन्हीसांजा असल्यामुळे गुलमोहर सुद्धा
काळसर. मोनोक्रोम मधलं मोठ्ठ चित्र!
वाटतं, असाच यावा पाऊस
अनपेक्षितपणे... चित्र अस्ताव्यस्त झालं तरी चालेल! पावसात सुंदरच दिसेल ते. खिडकी
पूर्ण उघडून जाईन मी बाहेर. चित्रातले सारे रंग विरघळतील माझ्यावर. मातीचा वास घेईन...
चित्राचा भाग होईन... पण कुठचं काय! घाम आलाय आता. आंघोळ करावीशी वाटतेय.
आंघोळ करतानाच ढगांच्या
गर्जना, विजेचा कडकडाट... खरं आहे? का भास? बाहेर बघितल तर काय, खरंच कोसळतोय
पाऊस.. मोठ्ठा! जोरदार वारा आणि वेड्यासारखा आडवा तिडवा कसाही पडत पाऊस आला! एकेका
पेशीला जिवंत करत मातीचा वास पसरला. पळत गेले खिडकीत. वाऱ्यासाठी अर्ध्या
उघडलेल्या खिडकीबाहेर गुलमोहर चिंब भिजत होता. अर्ध्या उघडलेल्या खिडकीतून पाऊस
माझ्या गालावर आला. एक क्षण मी कुठे हरवले माझा मलाच कळेना.
पण एकाच क्षण. दुसऱ्या
क्षणाला कसलं भान कुणास ठाऊक... मी उभी राहिले तिथे.. पण खिडकी पूर्ण उघडलीच नाही! मी बाहेर गेलेच नाही. त्या
दिवशी जोर जोरात पाऊस पडला. पण तोही मोठ्ठ्या फ्रेम मधलं चित्रच झाला.
पूर्ण चित्र? की अपूर्ण?
Comments
Post a Comment